उज्वल भविष्यासाठी उत्तम शेती, त्यानंतर शेती पूरक व्यवसाय व शेवटी नोकरी असे यशस्वी समीकरण असल्याचे भोडणी ( ता. इंदापूर, जि. पुणे ) येथील सत्यजित व अजिंक्य हंगे या बंधूनी सिद्ध करून दाखवले आहे. फायद्यांची गोसंवर्धन शेती व शेतीमाल उत्पादन पाहण्यासाठी देश-परदेशातून हजारो शेतकरी येऊन गेले असून, त्यांनी हंगे बंधू यांचा आदर्श घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘ मन कि बात ‘ मध्ये हंगे बंधूंच्या कार्याची दाखल घेऊन त्यांचा ” आत्मनिर्भर चॉम्पियन ” असा गौरव केला आहे.
सत्यजित हंगे यांचे शिक्षण एमबीए, तर अजिंक्य यांचे शिक्षण बीसीएस एमबीएपर्यत झाले असून, त्यांची वडिलोपार्जित ३२ एकर जमीन आहे. दोघेही अनुक्रमे मुंबई व पुणे येथे सिटी बँक व हॉंगकॉंग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन येथे नोकरी करत होते. मात्र, शेतीची ओढ असल्याने त्यांनी बँकेची गेलेलठ पगाराची नोकरी सोडून काळ्या आईची सेवा करण्याचे ठरवले. वडील शिवाजीराव हंगे परिसरात मोठे बागायतदार म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही बंधूनी २०१२-१३ मध्ये शेती करण्याचे ठरवले. त्यांनी घरातील ८ लाख रुपयांचे भांडवल वापरात शेतीत मूलभूत सुविधा विकसित केल्या. त्यांनी २१ एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने डाळींब, शेवगा, पपई, हे पीक देशी गाईंचे गोमूत्र व शेण वापरून घ्यायचे ठरविले. सुरुवातीस त्यांनी सहा गीर गाई गुजरात येथून विकत घेतल्या. गोमूत्र, शेण वापरून शेती यशस्वी करणाऱ्या बिदाल ( शिखर शिंगणापूर ) येथील अशोक इंगवले या शेतकऱ्यांची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी गुजरात येथील भास्करभाई सावे, तसेच कर्नाटक येथील नारायणा रेड्डी यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी केली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.
गाईंचा शेतीत वापर :-
हंगे बंधूनी पीक नियोजन आराखडा तयार करून शेतीत संपूर्ण रासायनिक खातेबंद करून देशी गाईंचे शेण, गोमूत्र वापरण्यास सुरुवात करून मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी डाळिंब, पपई, व शेवग्याची लागवड केली. गोमूत्र व शेणामुळे २० ते ३० पटीने सूक्ष्म जिवाणूंच्या संख्या वाढत असल्याने, तसेच स्लरी, कंपोस्ट खत, जीवामृत तयार करून वापरल्याने जमिनीचा पॉट वाढला. हे विरजण म्हणून काम करत असल्याने त्यांनी आणखी ७० गीर गाई विकत घेतल्या. त्यांनी गोमूत्र व शेणाच्या ५ हजार लिटर टॅंक तयार करून शेतीत सेंद्रिय पद्धतीने मल्चिं, मिश्र पीक पद्धत, वनभिंत उभारली. त्यानंतर त्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत देशी पपई विकण्यास नेली असता खुल्या बाजारात ८ रुपये दर असतांना त्यांना ४ रुपारे दर सांगितलं गेला. गुळासारखी चांगली चव असतानाही त्यांना योग्य दर मिळाला नाही. त्या नंतर त्यांनी शहरातील मॉलमध्ये पपई नेली असता, त्यांना सेंद्रिय प्रमाणपत्र मागितले गेले. त्यांनी पुण्यातील हडपसर येथे हाटगाड्यावर बसून पपई विकण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना योग्य दर मिळाला. मात्र हा माळ नाशवंत असून, त्याचे विपणन वेळेत करणे अवघड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शाश्वत बाजारपेठ असलेल्या शेती पूरक प्रोडक्ट तयार करण्याचा संकल्प करत २०१६-१७ मध्ये ” टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्मस ” ची स्थापना केली.
बाजारपेठ विकसित :-
हंगे बंधूनी पारंपरिक सेंद्रिय पद्धतीने देशी गाईंचे पाच प्रकारचे तूप, गूळ, शेंगदाणा, व त्याचे लाकडी घाना तेल, पीनट बटर, खपली गहू व आता, काकडी, मोरिंगो पावडर, लिंबाचे लोणचे आदी ३५ प्रोडक्ट तयार केले. दूध तापवून तूप करताना त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर लोणी निघून तूप करण्यास सुरुवात केल्याने त्याचा गोडवा वाढला. उसापासून त्यांनी गूळ तयार करण्यास सुरुवात केली केली. पारंपरिक सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या या प्रोडक्ट च्या विक्रीसाठी त्यांनी मोबाईल मधील विक्रीसाठी त्यांनी मोबाईलमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे घरात बसून त्यांनी प्रोडक्ट विकण्यास सुरुवात केली. भोडणी या गावात बनविण्यात येत असलेल्या या प्रोडक्टने आता भारताबाहेर ४८ देशात आपली हक्काची बाजारपेठ मिळवली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कोरियासह इतर देशात ऑर्डरनंतर थेट चौथ्या दिवशी माल पोहचत आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांचे प्रोडक्ट वापरात आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे भरता बाहेर ५५ हजार युनिक ग्राहक असून, १८ देशातील शेतकरी त्यांच्याकडे प्रशिक्षणास येऊन गेले आहेत. फेसबुक ने त्यांची यशोगाथा चित्रित केली आहे, तर भारतातील इपोट्रेंड ब्रँडमधील एक नंबर ब्रँड अशी त्यांची दाखल घेतली गेली आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्या कार्याची दाखल घेण्यात आली आहे. सध्या ते देशभरातील ६५० शेतकऱ्यांसमवेत सेंद्रिय शेती प्रसाराचे काम करत असून, दिल्ली, मुंबई, पुणे, व इतर शहर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील ते सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देत आहेत. देशातील प्रथम क्रमांकाच्या अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मानेगमेंट या संस्थेत त्यांनी व्याख्यान दिले आहे. हंगे बंधूंतर्फे पुणे, मुंबईत शेतकरी आठवडा बाजार हि संकल्पना गेल्या चार वर्षांपासून राबविली जात असून, त्यामुळे १५० हुन जास्त लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. जीएमपी, आयएसओ, यूएस फूड अँड ड्रगसारखी दर्जेदार प्रमाणपत्रे त्यांना मिळाली आहे. हंगे बंधूंची गरुडभरारी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे.