प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री बोधेगाव :-
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची जोड देऊन सुखी शेतकरी, सुखी भारताचे स्वप्न उरी बाळगून व्यंकटेश उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवार दि. ८ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वा हवामान तज्ञ् पंजाब डख तसेच वरिष्ठ शात्रज्ञ शामसुंदर कौशिक यांच्या उपस्थितीमध्ये सुखायु मोबाईल अँपच्या लोकार्पण सोहळ्या बरोबर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन महंत हभप बाबा गिरी महाराज यांच्या शुभहस्ते शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे करण्यात येणार आहे.
महागाईच्या या जमान्यात शेतकऱ्यांची होत असलेली फरपट, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादनात होत असलेली घट, शेती परवडत नसल्याने शेतीकडं पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, हे सर्व बदलण्यासाठी व्यंकटेश उद्योग समूहाच्या वतीने सुखायु ग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली असून बोधेगाव या ठिकाणी सुखायु शेतकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते तसेच शेतजमिनीची पोषकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते आणि शेतीसाठी मार्गदर्शन यासंदर्भात माहिती दिली जात आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना हवामान तसेच शेती संदर्भात अचूक माहिती उपलब्ध होण्यासाठी सुखायु मोबाईल अँपची देखील निर्मिती करण्यात आली आहे. याचे लोकार्पण येत्या शुक्रवारी दि. ८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात करण्यात येणार असल्याची माहिती व्यंकटेश उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे सह व्यंकट देशमुख, कृष्णा मसुरे, अनिल गुंजाळ, यांनी दिली असून उपस्थित राहण्याचे आवाहन सुखायुनचे व्यवस्थापक मनोज अभंग यांनी केले आहे.