कृषी पर्यटन संकल्पना राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात रुजली आहे. त्यांचा पुढील टप्पा म्हणजे गो पर्यटन. शेती आणि गोवंश संगोपनाला गोपर्यटनाची जोड दिल्यास निश्चितपणे आर्थिक उत्पन्न वाढीला चालना मिळणार आहे.
गोपालन करताना ते फक्त दूध उत्पादनासाठी न करता ती एक आपली परंपरा, संस्कृती आणि कर्तव्य आहे, असे समजून देशातील अनेक पशुपालक भारतीय गोवंश संगोपन करीत आहे. देशातील प्रत्येक सण हा गोपूजनापासून सुरु करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात गाई हा मानसिकदृष्ट्या सुखावणारा अविभाज्य घटक आहे. आजही अनेक शेतकरी भारतीय गाय कमी दूध देत असली तरी त्यांचे संगोपन, संवर्धन, अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे करतात. त्यापासून मिळणार फायदा किंवा तोटा यांचे मूल्यमापन करीत नाहीत. याचेच उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची संस्कृती म्हणून संगोपनात असणारी खिलार गाय. त्यामुळे गोपालन करताना फक्त दूध उत्पादन यापेक्षा आपली संस्कृती, भावना, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.
” गो” आधारित शेती :-
देशामध्ये देशी गोसंवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे करत असताना एक शाश्वत मार्ग शोधणे हि पुढील काळाची गरज आहे. ” गो ” आधारित शेती हा शाश्वत शेतीच्या दृष्टीने व्यावहारिक मार्ग आहे. देशातील अनेक भागांमध्ये देशी गोपालन आधारित शेती केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थ, शेण, गोमुत्राचा वापर जमीन आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो.
त्याच बरोबरिने कृषी पर्यटनाच्या बरोबरीने गो पर्यटन हि संकल्पना शेतकऱ्यांनी पुढे आणणे गरजेचे आहे. आजही बहुतांश शहरी भागातील लोकांना शेतकऱ्यांचे सहजीवन, संस्कृती माहिती नाही. जेष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी विविध भागात आपली जुनी शेती अवजारे आणि त्या काळातील शेतीशी निगडित वस्तूंचे संग्रहालय असण्याची गरज व्यक्त केली आहे. त्याच अनुषंगाने शरि व ग्रामीण समतोल राखण्यासाठी गो पर्यटन हि संधी शेतकऱ्यांच्या समोर आली आहे.
जमिनीचे आरोग्य, निसर्गाचे संवर्धन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या आरिग्यासाठी देशी गोपालन हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. बायोगॅस चा वापर करून कुटुंबाच्या स्वयंपाकासाठी इंधनाची उपलब्धता होते. बायोगॅस स्लरीमध्ये उपयुक्त जिवाणू संवर्धकांचे मिश्रण करून दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती शक्य आहे. त्यातूनही उत्पन्न वाढीला मदत होते.
देशी गोपालनातून व्यवसायवृद्धी
१) देशी गाईंपासून, दुधाव्यतिरिक्त शेण, गोमुत्राची उपलब्धता होते. याचा सेंद्रिय खतनिर्मितीसाठी उपयोग होतो. त्याच बरोबरीने अलीकडे कुंडी, धुपकांडी, साबण, गोमय, गणपती, फिनेल आणि गोमूत्रापासून विविध प्रकारचे अर्क बनवले जातात. अनेक शेतकरी पंचगव्यपासून जीवामृत तयार करतात. त्याचा सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
२) देशी गाईंच्या दुधापासून शेतकरी दुग्धजन्य पदार्थ तयार करत आहे. तूप तसेच पंचगव्य आधारित आरुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. याचीही स्वतंत्र बाजारपेठ विकसित झालेली आहे.
३) जागतिक तापमानवाढीच्या संकटांमध्ये देशी गोवंश आधारित शेतीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे देशी गोवंशाची विविध वातावरणामध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता आणि रोग प्रतिकारशक्ती. यामुळे जातिवंत पैदास देखील येत्या काळात उत्पन्नाचे साधन ठरेल.
४) विविध देशांमध्ये अनेक वर्षांपासून भारतीय गोवंशाचे संवर्धन आणि संशोधन सुरु आहे. त्याचे उदाहरण म्हणजे ब्राझीलमधील गीर आणि ऑस्ट्रेलिया, केनिया देशातील साहिवाल गोवंशाचे संवर्धन आणि संशोधन.
देशी गोवंश संशोधन केंद्र :-
पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. यामध्ये देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर राठी, थारपारकर, लाल सिंधी, तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध खिलार, लाल कंधारी, देवणी, डांगी, गवळाऊ, आणि कोकण कपिला गाई पाहावयास मिळणार आहेत
त्याच प्रमाणे गो आधारित शेती, बैलचलित अवजारे, दूध आणि दुधजन्य पदार्थ, शेण- गोमूत्र आधारित विविध वस्तू, खते, कीडनाशके, बायोगॅस, सौरऊर्जा, प्रकल्प, चार आणि औषधी वनस्पती उद्यानाची उभारणी करण्यात येत आहे. यातून गो पर्यटन प्रकल्प आकारास येत आहे.
“गो ” आधारित पर्यटन :-
परदेशातील पशुपालकांनी ‘ काऊ काडलिंग ‘ हि संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात राबवली आहे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी गाईच्या सहवास महत्वाचा ठरतो, असे समजले जाते. त्या दृष्टीने दररोजची दगदग, ताणतणाव विसरून मन शांतीसाठी देशी गाईंचा सहवास हि संकल्पना महत्वाची आहे. यामध्ये देशी गोपालकांना चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शालान्त अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश केला आहे. यामुळे लहान मुलांना शालेय जीवनापासून कृषी व कृषी संलग्न विविध विषयाची माहिती उपलब्ध होणार आहे. शहरातील शाळांना शेतीतील जैवविविधता दाखवण्यासाठी ” गो टुरिझम ” महत्वाची भूमिका बजावू शकते. निसर्गातील “इको-सिस्टीम ” चा अभ्यास करण्यासाठी गो टुरिझम व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे.