एखादा व्यवसाय करण्यासाठी आपल्याजवळ नेमकं काय असायला हवं? व्यावसायिक शिक्षणाची अधोरेखित समीकरणं बाजूला ठेऊन विचार केला, तर सरासरी माणसाच्या मनातील ढोबळ गोष्टींचा विचार केल्यास दोन ते तीन गोष्टी व्यवसाय करण्यासाठी पुरेशा आहेत असा आपला सर्वांचा समज असू शकतो. सर्वसामान्य व्यक्तीच्या अनुषंगाने व्यवसायिकतेची गुणोत्तरे फक्त भांडवलावर येऊन थांबतात आणि भांडवलाची सक्षम उभारणीचे स्रोत शोधत सामान्य माणसाची उद्योजकता अकस्मात मावळते.
भांडवलावर आधारित उद्योग आणि उद्योगावर आधारित मासिक खर्च इतकाच काहीसा सर्वसामान्य व्यक्तींच्या मेंदूतील मूलभूत विचारांचा पायंडा आजकाल पडलेला दिसतो. नोकरी नाही म्हणून व्यवसाय किंवा वैचारिक खोलात रुजलेली नोकरी बद्दलची कटुता, कदाचित बऱ्याच लोकांच्या मनात व्यासायिकतेची हिरवळ पेरत चालते आणि मग सतरा अपंग सल्ले आणि व्यावसायिकतेत टाकलेले अशक्त पाऊल एखाद्या आजारी व्यवसायाचे समूळ कारण बनायला वेळ लागत नाही. व्यवसायाचं गणित लावत-लावत मग एखादा अशक्त व्यवसायाचा सोज्वळ मालक आपल्या अनुभवाच्या रोजनिशीत व्यावसायिकतेची नवीन समीकरणे तयार करून पुढच्या पिढीमध्ये त्याची बीजे नकळत पेरू लागतो आणि मग एक सबंध पिढी तयार होते, व्यवसायाच्या सावलीला बघून भयानक घाबरणारी!आपल्या घराण्यात कधी कोणी व्यवसाय केला आहे का? व्यवसाय करणं ही काय खायची गोष्ट आहे का? व्यवसाय करायला कमी भांडवल लागतं का? हे असले नसते प्रश्न मग अविरतपणे सामान्य लोकांच्या घरातून अतिसामान्य लोकांच्या घरात वावरायला चालू होतात. तिथेच मग व्यवसाय करणाऱ्यांची आपली जात नव्हेच,अशी ठळक रेष आपण आपल्या कपाळावर मारून घेतो. व्यावसायिकतेला फाट्यावर मारत मग सर्वसामान्य घरातील पिढी झगडू लागते नोकरीसाठी! नोकरीचा पेशा मिळवण्यासाठी अर्धी हयात खर्च करत पिढीची काडी होते, तरी नोकरी बद्दलची असणारी अस्मिता मात्र संपत नाही ही विशेष बाब! नोकरी न मिळालेले, नोकरीच्या मागे लागून यशाची न गाठलेली शिखरे चढणारी स्वप्नपिले मग व्यवसायाची शिशारी लागल्यागत धावू लागतात एखाद्या यशस्वी व्यवसायिकतेची कहाणी ऐकून; भान गेल्यागत! मग हाडाचे व्यावसायिक तयार करायला बिना हाडाचे दवणे सरसावू लागतात. आशेची छटा दाखवत व्यवसायिकतेची धडे देत ते बाजार मांडतात आपल्याच हतबलतेचा! आत्मविश्वासाची सदृढ हवा मस्तकात भरताना मग आपल्यालाच समजत नाही नेमका विश्वास तरी कोणावर ठेवावा? स्वतःच्या कर्तृत्वावर की सबंध तासभर व्यवसायिकतेचे धडे देणाऱ्या त्या अजिंक्य शब्दांनी भुरळ घालणाऱ्या पामरावर? एका तासात गर्जनाऱ्या शब्दांनी व्यवसाय करता येणं खरंच शक्य आहे का? याचा विचार करणं नेमकं गरजेचं होऊन बसलं आहे.एक साधारण विचार बांधले तर व्यवसाय करायला फक्त निकडीची गरज असावी आणि चिकाटीने पूढे नेणारा स्वतःवरचा पुरेसा आत्मविश्वास गरजेचा आहे. अनुभव, भांडवल, ठरवलेल्या व्यवसायबद्दलची बाजारात असणारी मागणी, स्थळ इत्यादी गोष्टी या ज्या-त्या व्यवसायावर अवलंबून असतील परंतु गरज आणि पुरेशी चिकाटी माणसाला व्यवसायाचे गणितं जुळवायला नक्कीच खूप मदत करते हे मात्र सत्य आहे. या दोन गोष्टी बाकी व्यावसायिक ऊर्जा स्रोतांना जुळवायला एकदम सफल आहेत.
—————————-
————————–
Empowering Business
Empowering Nation
उद्योगक्रांतीचे अपडेट्स सुरु करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
Whattsapp-https://bit.ly/3ljZyxs
फेसबुक– https://bit.ly/3oCH8tZ
Youtube – https://bit.ly/3AexIXz
एक शेतकरी जोपर्यंत स्वतःला शेतकरी म्हणून घेतो तो फक्त आणि फक्त कष्टकरी शेतकरी म्हणून ओळखला जातो. पण एक शेतकरी स्वतःला व्यवसायिकतेकडे नेऊ इच्छितो तो शेतकरी फक्त शेतकरी न राहता एक व्यावसायिक, सधन शेतकरी म्हणून ओळखला जाऊ शकतो हे साधारण उदाहरण आहे तुमच्यातील व्यवसायाच्या बिजाला जोपासायला! तर आपल्या व्यावसायिकतेला दर्जा देण्याचं काम हे आपण स्वतः करू शकतो. दुसऱ्यांचे नसते सल्ले हे त्यांच्या मर्यादेच्या सीमेत तयार झालेले असतात,त्यामुळे त्यांचे सल्ले कदाचित आपल्या सीमारेषेतील अमर्याद व्यासाला भेदू नाही शकत. त्यासाठी स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय सफल करण्यासाठी आपल्यातली चिकित्सक वृत्ती नियमित तेवत ठेवा आणि आपल्यातली गरज सतत पेटवत चिकाटीचा नुसता धुरळा उडू द्या. जेव्हा तुम्ही सकस नियोजनाने व्यवसाय करता, तेव्हा यश आणि अपयश या तुमच्या व्यवसायाच्या खरतर बाजू होत नाहीत, मिळालेलं यश व्यवसायाचं नसतं किंवा अपयश तुमचं चुकलेलं गणित नसतं. मिळालेलं यश तुमचंच आहे,तुमच्या जिद्दीचं आणि कदाचित आलेलं व्यवसायिक अपयश देखील तुमचंच आहे, करायला हव्या त्या गोष्टी न केल्याचं फलित समजून! मित्रांनो, व्यवसायिक तत्वज्ञानाच्या भांड्यात वाकून पाहण्याऐवजी ओघम,मोकळ्या,डोळ्याला स्पष्ट दिसणाऱ्या व्यवसायातील क्लृप्त्या बाजारात फिरत-फिरत डोक्यात घ्या . माती विकायची अक्कल,शेण विकायची युक्ती आणि अंगाचा मळ काढणारा दगड विकून जर कोणी स्वतःची उपजीविका भागवू शकतो, तर तुम्ही नक्कीच खिशात हात घालून स्वतःला चाचपडून तुमच्या कुवतीच्या बाहेर पडून नक्कीच व्यावसायिक बनू शकता! नसते उद्योग करत करत बाजारात धडपडत घर चालवणाऱ्या माणसाच्या व्यवसायिकतेचं गुणोत्तर शोधायला एकदा जा! तुमची व्यवसायिकतेची शैक्षणिक गुणोत्तरे त्यापूढे नक्कीच फिकी पडतील यात शंका नाही!
उद्योगक्रांती
Empowering Business
Empowering Nation