http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

तुमच्या साधारण आयुष्याला असाधारण आयुष्य बनवण्यासाठी कधी तुम्ही स्वतःच्याच आयुष्याला उलगडण्याचा किंवा आजमावण्याचा प्रयत्न केला आहे? किंवा सर्वसाधारण आयुष्य जगताना पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांना बिलगण्याचा प्रयत्न तरी तुम्ही कधी केलाय? भारतात जवळपास सर्वच सर्वसाधारण कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पैशांचे,श्रीमंतीचे स्वप्न पाहण्याचे डोहाळे कधी न कधी आयुष्यात लागून गेलेलेच असतात.पण ते पैसे कमवण्याची अक्कल सर्वांनाच असते असे नाही! अक्कल म्हणण्यापेक्षा आपण त्याला संधी शोधणारी दृष्टी म्हणू.होय,संधी शोधणारी दृष्टीच! पैसे कमवण्याचं माध्यम तुमच्या दृष्टीस पडण्यासाठी अपार मेहनतीच्या प्रवासातून येणाऱ्या अनुभवाची संगत तितकीच महत्वाची ठरते.

Empowering Business ..

Empowering Nation

उद्योगक्रांतीचे अपडेट्स सुरु करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Whattsapp-https://bit.ly/3ljZyxs

फेसबुक- https://bit.ly/3oCH8tZ

Youtube – https://bit.ly/3AexIXz

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील लोधवडे गावात जन्मलेल्या रामदास मानेंची कहाणी काहीशी सर्वसाधारण पासून सुरू होऊन असामान्यतेच्या पुढे जाऊ लागते. गरीब कुटुंबात जन्मलेल्या रामदास मानेंची यशोगाथा मनाला थक्क करणारी आहे. एकेकाळी घरात खायला अन्न नसणाऱ्या रामदास मानेंच्या परस-स्पर्शाने आज जवळपास १४००० लोकांच्या आयुष्याला रोजगार मिळालेला आहे. कधी एकेकाळी आई-वडिलांसोबत ढेकळं फोडून पोट जगणाऱ्या या माणसाने आजतागायत परदेशी दौरे करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत. १९७२ च्या दुष्काळात शिक्षण घेणे तर दूरच पण पोटाची खळगी भरणे देखील कठीण होते,अशा दयनीय परिस्थितीत शिक्षणाची आवड असल्याने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी बराशी खांदून मिळालेल्या पैशात वह्या आणि पुस्तके घेणाऱ्या माणसाची आज करोडो रुपयांची उलाढाल आहे. हे सगळं विश्वास न बसण्यासारखंच आहे ना? तरीही तुम्हाला यावर विश्वास ठेवावाच लागेल! कारण रामदास माने यांची ही असामान्य वाटणारी यशोगाथा अगदीच खरी आहे!

रामदास मानसिंग माने यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झालेला. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची आवड असल्याने गावापासून १४ की.मी. दूर पायी चालत जाऊन त्यांनी स्वतःचे शालेय शिक्षण पूर्ण केले.यावरूनच त्यांच्या मनात बांधलेली जिद्दीची गाठ किती घट्ट होती हे दिसून येते. १९७५ साली त्यांनी दहावी उत्तीर्ण करून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिपाई होण्यासाठी पहिला प्रयत्न केला होता.घंटा वाजवण्याची नोकरी अगदी सोपी असते असा समज त्या काळी त्यांच्या मनात आल्याने, त्यांनी शिपाई पदासाठी केलेला प्रयत्न आजच्या घडीला त्यांच्या यशाकडे पाहून अगदी विनोदाचा भाग वाटतो. तेव्हाच कोणीतरी त्यांना आय.टी.आय.चे शिक्षण घेण्याचे सुचविल्याने त्यांनी आय.टी.आय.चे शिक्षण घेत त्याकाळी ८८ टक्के गुण घेऊन पहिला येण्याचा मान मिळवला.आय.टी.आयचे शिक्षण घेत असताना त्यांनी बस स्टॉपच्या कँटीनमध्ये रात्रपाळीत काम करून स्वतःच्या राहण्याची व खाण्याची  सोय केली होती. यश गाठण्याच्या प्रवासात अडथळे आले तरी त्यावर मार्ग काढण्याची कुवत असावी लागते याचीच प्रचिती येथे दिसून येते.आजची पिढी न मिळालेल्या सुविधांना दोष देत स्वतःच्या अपयशाला कारणे जोडतात त्यांच्यासाठी रामदास माने हे प्रेरणादायी उदाहरण ठरतील. आय.टी.आयचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत त्यांना नोकरीची संधी मिळाली. परंतु पुण्याला जाण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी त्यांच्या आजोळी जाऊन आज्जीकडून वीस रुपये घेऊन सरळ पुणे गाठले आणि पुण्यात महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोकरी मिळवली. राहण्याची सोय नसल्याने पूर्ण एक वर्ष त्यांनी एका पाण्याच्या टाकीखाली निवारा करत दिवस काढले. नोकरीत प्रगती करत असताना त्यांना एका दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची आणि मोठ्या हुद्द्याच्या नोकरीची संधी मिळाली.परंतु ती नोकरी स्वीकारण्यास तीन महिन्याचा अवधी बाकी असल्याने त्यांनी आपल्या आतल्या वायरमनला मरू न देता काम शोधण्याचे वृत्त चालू ठेवले. 

काम करत असतानाच त्यांची थर्माकोल मशीनरीसोबत ओळख झाली आणि तिथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.थर्माकोल बनवणाऱ्या मशिनरी त्या काळी परदेशातून येत असत. त्यांची भारतीय बाजारातली किंमत अतिशय महाग असे. त्यामुळे माने यांनी स्वतः थर्माकोल बनवण्याचे मशीन तयार केले आणि परदेशी मशिनपेक्षा खूप कमी दरात ते विकू लागले. या मशिनला सर्वत्र मागणी येऊ लागली आणि मद्रास कंपनीकडून त्यांना पहिली सहा लाखाची ऑर्डर देखील मिळाली. हा प्रवास इथून जो सुरू झाला तो आजतागायत बंद झालेला नाही. अनेक अडचणींवर मात करत रामदास माने यांनी जागतिक स्तरावर थर्माकोल इंडस्ट्रीत आपले पाय घट्ट रुजवले.१९९३ साली “माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज”ची स्थापना करून त्यांनी या व्यवसायात आपली गरुड झेप चालू ठेवली. आज जवळपास ४५ देशात थर्माकोल बनवण्याचा माने कंपनीचा प्लांट आहे. ते परदेशात मशिनरीसहीत थर्माकोल निर्यात करतात. यातून १४००० लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.तसेच ३०० ते ३५० भारतीय लोकांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यांनी आजवर 149 देशात प्रवास देखील केलेला आहे. भारतात ८०% थर्माकोल हा फक्त माने इंडस्ट्रीजमधून तयार झालेल्या मशिनरीचा प्रताप आहे! माने यांना त्यामुळेच “थर्माकोल मॅन” असेही म्हणतात. जगातील सर्वात स्वस्त थर्माकोल बनवण्याचे मशीन तयार करण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.

२००७ साली त्यांचे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले गेले आहे. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि उरुग्वे या देशांकडून देखील सन्मानित करण्यात आले आहे.पुढे त्यांनी “स्वच्छ भारत अभियान” या देशपातळीवरील मोहिमेत उडी घेत स्वस्त दरात टॉयलेट उपलब्ध करून देत एक नवीन क्रांतीच घडवून आणली. फक्त दोन तासात तयार होणारे टॉयलेट त्यांनी निर्माण करून दिले. जवळपास १७ राज्यात “ना नफा ना तोटा” या तत्वावर त्यांनी २३००० शौचालये उपलब्ध करून दिली. सामाजिक बांधिलकी जोपासत २५ नववधूंना त्यांनी मोफत शौचालये भेट म्हणून दिली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत २०१६ साली त्यांना “सेनीटेशन लीडरशीप” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज त्यांना “टॉयलेट मॅन” म्हणून देखील संबोधले जाते.

रामदास माने एका खाजगी वहिनीच्या मुलाखतीत नवीन पिढीस सांगतात ” भाषा,परिस्थिती,गरिबी आणि संकटे कधीही तुमच्या महत्वकांक्षेच्या आड येत नाहीत.” त्यांचे हे वाक्य खरेतर आजच्या पिढीसाठी एक प्रेरणास्रोतच आहे. एका दुष्काळग्रस्त भागातील गरीब कुटुंबात वाढलेल्या या उद्योजकाची श्रीमंती जणू काही एक क्रांतीच आहे! आजच्या घडीला पिढ्यानपिढ्या व्यावसायिक वारसा लाभलेल्या गर्भश्रीमंत समूहाच्या कोलाहलात रामदास माने जास्त उठून दिसतात.परिश्रमाची कास माणसाला अनुभवाच्या आणि जिद्दीच्या पूढे उभे करून एक सुवर्णलिखित यशोगाथा पदरात पाडते याचे जिवंत उदाहरण रामदासजी माने आहेत! 

उद्योगक्रांती..

Empowering Business

Empowering Nation

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..