आमच्या कार्याची ओळख करून देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
अर्थपूर्ण सामाजिक बदलाच्या माध्यमातून समुदायांचे सक्षमीकरण करण्याची आमची वाटचाल.
हे जग सुख-दु:खांच्या भावनांवर तरलेलं आहे, असं कोणी म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. पण, जगण्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी आवश्यक आहेत. याचबरोबर आरोग्य, शिक्षण, महिला विकास, विद्यार्थी विकास आणि अजूनही अशी बरीच क्षेत्रं आहेत. जी माणसाच्या जगण्याला सहज करतात.
मात्र, इतक्या वर्षानंतरही अनेक नागरिकांपर्यंत या गोष्टी पोहचल्याच नाहीत. म्हणूनच २०१५ मध्ये अ.नगर जिल्ह्यातील, बालमटाकळी येथील माळरानावर व्यंकटेश फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. ही संस्था उदयास येण्याच्या आधीपासूनच व्यंकटेश ग्रुपच्या संस्थापक व सह-संस्थापकांनी सामान्यांची सेवा करण्याचा आरंभ केला होता. आजमितीला संस्था सामान्यांचा आधार म्हणून नावरूपास आली असून थोडं इतरांसाठी जगूया… हे बोधवाक्य संस्थेनं सार्थ ठरवले आहे.
आज संस्थेचं काम महाराष्ट्रभर पसरलं आहे. संस्था तळागाळातील घटकांसाठी मोठ्या ताकदीने कार्यरत आहे. यामध्ये, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता आणि बॅंकिंगचाही समावेश आहे. याचबरोबर, देशी गाईंच्या संवर्धनाचे कामही हाती घेतलं आहे. याशिवाय वर्षभर आरोग्य शिबिरं व प्रशिक्षणं शिबिरं राबवली जातात. तसेच, अन्नछत्रालयाच्या माध्यमातून जेवणाचा डब्बा मोफत दिला जात आहे. गावा-खेड्यात राहणाऱ्या नागरिकांना पाण्या-पावसात अंत्यविधी करताना अडचणी येऊ नये. यासाठी संस्थेच्या वतीने स्वर्ग रथाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली असून ती मोफत आहे. याचबरोबर कोणाची व्यवसाय उभा करण्याची इच्छा असल्यास व्यंकटेश फाऊंडेशन अर्थ सहाय्यही करत आहे.
जिथे सामान्यांना गरज आहे, त्या प्रत्येक क्षेत्रात संस्थेने आपली उपस्थिती दाखवली आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे व पाठिंब्यामुळे इथपर्यंत पोहचलो आहोत. आम्हाला माहिती आहे हे नातं अजून फुलतच राहणार आहे... आपली सोबत कायम अशीच राहू द्या.
प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार, प्रगतीची समान संधी आणि गरजेच्या वेळी आधार मिळेल, असा संवेदनशील, सक्षम आणि सर्वसमावेशक समाज घडवणे..
आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर बनवणे; तसेच समाजात सकारात्मक आणि शाश्वत बदल घडवून आणणे.
एक शब्द आम्हाला कायम प्रेरणा देतो... ‘जाणीव’..! हा केवळ एक शब्द नाही; तर एक भावना आहे. कर्तव्य आहे. समाजाप्रती.. माणसांप्रती..
ज्या मातीनं आपल्याला घडवलं तिच्याप्रती! थोडं इतरांसाठी जगूया ! या उद्देशानं व्यंकटेश फाऊंडेशन अखंडपणे कार्य करत आहे. आपण पुढे जात असताना किंवा प्रगती करत असताना ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं, ज्यांचं बोट धरून आपण वाट चाललो, त्यांना विसरून कसं चालेल.
समाजाचं ऋण आम्ही कधीच विसरणार नाही. आपली माती आणि आपली माणसं यांचे अनंत उपकार असतात आपल्यावर. ते फेडणं तर अशक्य आहे पण त्यांची जाणीव ठेवून समाजासाठी काही करत राहणं हीच भावना आमच्या मनात कायम घर करून आहे.
शाळेतले विद्यार्थी, शेतकरी बांधव, आमच्या माता-बहिणी, कष्टकरी, व्यापारी आणि कितीतरी असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी आपण शतशः वाटा लावीत उचलत आहोत. यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन नित्यनेमाने, अविरत, अखंड कार्य करत आहे. यात आपला मिळणारा आपला सहभाग देखील आम्हाला शक्ती देतो. सामाजिक सेतू बांधण्याच्या या मानवीय कार्यात असंच आमच्या सोबत रहा!
कारण ‘ह्या हृदयाचे त्या हृदयी’ यापेक्षा सर्वोत्तम आनंद या जगी दुसरा नाही.. ही ‘जाणीव’ आमच्या मनात जिवंत आहे आणि राहील..
मनापासून धन्यवाद...